खेड बुद्रुक सरपंच यांनी पायपीट करीत ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन व लसीकरण केल्याने कौतुक
खंडाळा : खेड बुद्रुक ता. खंडाळा येथील कोरोना विषाणू दुसऱ्या लाटेत रुणांचे प्रमाण जास्त आढळले असल्याने सरपंच गणेश धायगुडे यांनी पायपीट करून गावातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन करीत लसीकरणासाठी त्यांना प्रेरित करुन वृद्धांचे 100 टक्के लसीकरण करण्यास मदत केल्याने सरपंच यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच हेच धोरण राबवित असतात. खेड बुद्रुक गावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर ही लाट आटोक्यात आणण्यासाठी आगामी काळात पुन्हा गावावर अशी वेळ येऊ नये व्यासाठी सरपंचांनी पायपीट करून गावातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन करीत लसीकरणासाठी प्रेरित केले.
गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सरपंच गणेश धायगुडे यांनी गावात विलगीकरण कक्ष स्थापन करून उपक्रमातून गावातील ४५ वर्षाच्यावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी घरोघरी जाऊन वयस्कर ग्रामस्थ यांचे मनातील भिती दूर करून त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. लसीकरण ठिकाणी प्रत्येकाला नेऊन लस दिली. त्यामुळे कोरोना विषाणूला अटकाव घालणे शक्य झाले. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातअसल्याने पुन्हा गावात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गावपातळीवर नियोजन केले आहे. 70 वर्षावरील नागरिकांना लसीकरण केल्यास कोरोनापासून गाव दूर राहणे शक्य होणार असल्याने प्रत्येक घरी सरपंचांनी घरभेटी देऊन लसीकरणाबाबत प्रबोधन केले.
सरपंच गणेश धायगुडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर वायदंडे, सचिन वायदंडे, अनिल रासकर, सुनील रासकर व सहकारी यांनी गावातील ग्रामस्थ यांचे प्रबोधन केले.