फलटण तालुक्यातील 3 गावे मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर : डॉ. शिवाजीराव जगताप
फलटण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फलटण तालुक्यात गेले काही दिवसांत वाढून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. फलटण तालुक्यातील निंभोरे दुधेबावी व ढवळ ही 3 गावे खबरदारीचा उपाय म्हणून मायक्रो कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश आज शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी काढले आहेत.

फलटण तालुक्यातील मायक्रो कंटेंटमेंट झोन जाहीर केलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील हॉस्पिटल व मेडिकल सेवा नियमित सुरु राहतील. इतर सर्व अस्थापना बंद राहणार असून सकाळी ६ ते ९ या वेळेत फक्त दूध व भाजीपाला या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. स्थानिक स्वराज्य संस्था इतर आवश्यक वस्तू नागरीकांना पोहोच करणेचे नियोजन त्यांचे स्तरावर करावे. मायक्रो कंटेंटमेंट झोन व बफर झोन करिता असलेले सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे नागरिकांवर बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

निंभोरे येथे दि 8 एप्रिल रोजी 16 पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण गावठाण परिसर सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून, दुधेबावी येथे दि 8 एप्रिल रोजी 12 पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने मळवी वरचा मळावस्तीपयंतचा संपूर्ण परिसर सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून तर ढवळ येथे दि 8 एप्रिल रोजी 14 पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने गार्डेमळा जाधव वस्ती शिंदे वस्ती लोखंडे वस्ती गावठाण पर्यंतचा संपूर्ण परिसर सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले असून निंभोरे दुधेबावी व ढवळ ही तीनही संपूर्ण गावे बफर झोन घोषित करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.