फलटण सातारा रस्त्यावर फरांदवाडी येथे चार चाकी व दुचाकी अपघातात एक जणाचा मुत्यू
फलटण : फरांदवाडी ता. फलटण गावचे हद्दीत फलटण सातारा रस्त्यावर जगताप पेट्रोल पंपासमोर टोयाटो इटिओस चार चाकी गाडीने समोर असलेली मोटर सायकल ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकी चालक सचिन जाधव यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. 8 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फरांदवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत जगताप पेट्रोल पंपासमोरील फलटण सातारा रोडवर सातारा बाजूकडून येणारे टोयाटो इटिओस गाडी (क्रमांक एम एच 42 ए ए 3222) यावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील गाडी बेदरकारपणे अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याचे समोर असलेली मोटर सायकल ओव्हरटेक करताना फलटण बाजूकडून सातारा बाजूकडे निघालेली हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक (एम एच 11 सी ए 3432) वरील चालक सचिन जयवंत जाधव (वय 30 रा. आदर्की बुद्रुक ता. फलटण जि. सातारा) याला जोराची धडक देऊन अपघात करून गंभीर जखमी केले. सचिन जाधव याला औषध उपचारासाठी न नेता अथवा पोलीस स्टेशनला खबर न देता चार चाकी वाहन चालक पळून गेला असून अपघात करुन जखमीचे मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून फलटण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष किसन शिंदे (वय 43 रा. नवामळा ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
सचिन जाधव हे श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को. आप. क्रेडीट सोसायटी फलटण या संस्थेत गेल्या 8/10 वर्षापासून शिपाई पदावर काम करीत होते. फलटण आदर्की लोणंद बिबी शाखेमध्ये त्यांनी काम केले असून आज फलटण वरुन घरी येत असताना त्यांचेवर काळाने झडप घातली.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला.
सचिन जाधव यांचे अपघाती निधन झाल्याने जाधव कुटुंबीय यांचेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रात्री उशीरा आदर्की बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिन जाधव यांचे पश्चात आई वडील पत्नी दोन विवाहित बहिणी व 4 वर्षे वयाची एक मुलगी असा परिवार आहे.