विडणी येथे दुचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातातील युवतीचे उपचारा दरम्यान निधन
फलटण : फलटण पंढरपूर मार्गावर विडणी, ता. फलटण गावच्या हद्दीत येथील महाविद्यालयीन युवतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. आपला वाढदिवस घरी साजरा करुन केकसह मैत्रिणीकडे जात असतानाच तीच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पर्णवी तथा जान्हवी संजय काकडे (वय २१ मंगळवार पेठ, फलटण) असे या दुर्दैवी मृत तरुणीचे नाव आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पर्णवी उर्फ जान्हवी संजय काकडे ही युवती आज (शुक्रवार) दुपारी २ च्या सुमारास फलटणहुन विडणीकडे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या मैञीणीकडे दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी विडणी गावच्या हद्दीतील कोकरेवस्ती येथे तीच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या ट्रॕक्टरने (एम. एच. ४५ एस ३३७२) ओव्हरटेक करताना मागील ट्रॉलीची धडक बसली यामध्ये जान्हवी संजय काकडे ही गंभीर जखमी झाली, उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले परंतू उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला. या अपघातातील ट्रॕक्टर चालक अपघातानंतर घटनास्थळावरुन ट्रॕक्टर घेऊन फरार झाला असून या अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.
जान्हवी काकडे हीने एमएस्सी ॲग्री पदवी घेतली होती. तीने बीएस्सी ॲग्री फलटण येथील शेती महाविद्यालयात तर एमएस्सी पदवीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले होते. सध्या ती यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने नुकतीच यूपीएससीची प्रिलियम परीक्षा देखील दिली होती.
दरम्यान जान्हवीचा मित्र परिवार मोठा होता. दि.३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता तीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला होता. दुपार पर्यंत अनेकांनी सोशल मिडीयावर तीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या, परंतू वाढदिवसा दिवशीच तिचा मृत्यू झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव केलेल्यांना जान्हवीस श्रध्दांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ नातलग व मित्रपरिवावर आली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags
आरोग्य व शिक्षण
वाईट झाले