तरडगांव येथील तपोनिधी इंदुबाई कपाटे (आई) यांचे निधन
Spread the love
फलटण : श्रीब्रम्हविद्या पाठशाळा, महानुभाव आश्रम तरडगाव ता. फलटण येथील आश्रम संस्थेचे संचालक प. पू. महंत श्री राहेरकरबाबा महानुभाव यांच्या मातोश्री तपोनिधी इंदुबाई कपाटे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
तपोनिधी इंदुबाई कपाटे (आई) या अनेक दिवस आजारपणाशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर तरडगांव ता. फलटण येथील महानुभाव पंथीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तपोनिधी इंदुबाई कपाटे (आई) यांचा जन्म जाखणगांव ता. खटाव येथे झाला. काही काळ मुंबई येथे वास्तव्य केल्यानंतर महानुभाव पंथभुषण आचार्यप्रवर महंत कै.श्री नागराजबाबा महानुभाव, संभाजीनगर यांच्याकडे महानुभाव पंथीय अनुग्रह व संन्यास दिक्षा घेतली. त्यागमूर्ती महंत कै.श्री जुन्नरकरबाबा महानुभाव यांच्या संपर्कातून ईश्वरमार्गाचा योग त्यांना आला.
श्रीब्रम्हविद्या पाठशाळा व महानुभाव आश्रम तरडगाव ता. फलटण आश्रम संस्थेच्या जडण घडणीत तपोनिधी इंदुबाई कपाटे (आई) यांचा मोलाचा वाटा होता. संचालक महंत श्रीराहेरकरबाबा महानुभाव यांच्यावर त्यांनी धर्मरुप संस्कार केले.
तरडगांव ता. फलटण येथे श्रीब्रम्हविद्या पाठशाळा महानुभाव आश्रम या संस्थेच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी व जडण घडणीसाठी गेली 30 ते 35 वर्षापासून तपोनिधी इंदुबाई कपाटे (आई) यांनी अखंडपणे कष्ट मेहनत घेतली आणि सेवा रुपाने महत्वपूर्ण योगदान दिले. ग्रामीण भागात भिक्षाविधी, पायी तिर्थयात्रा, घरोघरी जाऊन अनेकांना महानुभाव पंथीय धर्मरुप मार्गदर्शन अशा विविध माध्यमातून आईचे धर्मकार्य हे प्रेरणादायी ठरले आहे.
तपोनिधी इंदुबाई कपाटे (आई) यांनी लाळणे,ताळणे आणि संस्कार या दृष्टीने असंख्य पंथीय भाविकांचे मातृत्व स्विकारले होते. त्यांनी अनेकांना धर्म विचारांना प्रवृत्त केले, त्यांनींछ अध्यात्म साधनेतील वाढ वृद्वीसाठी वात्सल्यतेने चिंतन केले. कळत न कळत घडलेल्या अपराधांना उदारपणे क्षमा केली. सर्वांगीण दृष्टीने अनेक साधक, साध्वी, नामधारक, गृहस्थ बंधू भगिनी या सर्वांच्यासाठी धर्मरुप कार्य पुढे नेण्यासाठी ज्याचं असणं अत्यंत मोलाचं होतं. त्यांच्या जाण्याने असंख्य साधकांनी हळहळ व्यक्त केली. ब्रम्हविद्या परिवाराचे भुषण असणार्या या माऊलींच्या अंत्यविधी यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो संत साधक,पंथीय अनुयायी उपस्थित होते. राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यवसायिक क्षेत्रातील अनेकांनी उपस्थित राहून दुःखात सहभाग होऊन शोक संवेदना व्यक्त केली.